About Us

Citypedia : Encyclopedia for Cities, Citizen & Civic Movement .. For the cities By the citizen of Civic Movement

Citypedia News : Select News from Metros of Maharashtra .. with citizen participation

महाराष्ट्रातील वाढत्या शहरीकरणाचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न ‘सिटीपीडिया न्यूज’मधून केला जाईल. महाराष्ट्रात अनेक महाकाय शहरे आहेत, लहानमोठी शहरे आहेत. शहरीकरणाची प्रक्रिया अगदी मागासलेल्या ग्रामीण भागांत, गावोगावीही पोहोचली आहे. शहरीकरण आपल्या रोजच्या आयुष्यात कळत नकळत स्पर्श करत असते. शहरीकरणाची प्रक्रिया अनेक पदरी असते: जसे लोकसंस्कृती, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, पर्यावरण, स्वच्छता, निवारा, शहर नियोजन वगैरे वगैरे. या सर्वाचा वेध आणि दखल सिटीपीडिया न्यूजमध्ये घेण्यात येईल.

हल्ली बहुतेक सर्व वृत्तपत्रांच्या त्या त्या शहरांच्या पुरवण्या असतात. टीव्ही चॅनेलवरून देखील शहरांच्या बातम्या खास कव्हर केल्या जातात. मग ‘सिटीपीडिया न्यूज’ची वेगळी गरज काय? एक तर ‘सिटीपीडिया न्यूज’ हे मुख्यतः ऑनलाईन प्रकाशित होईल जे मोबाईलवर वाचता येईल आणि शिवाय ते प्रिंट स्वरूपात देखील उपलब्ध असेल. दुसरे म्हणजे, जरी प्रस्थापित प्रसार माध्यमे शहरीकरणाची योग्य ती दखल घेत असली तरी वाढत्या शहरीकरणाकडे आणि त्यातील समस्यांकडे तसेच समाजबदलाच्या दिशेने जेवढे आणि जसे गांभीर्याने बघायला हवे तेवढे बघितले जात नाही. तिसरे म्हणजे शहराच्या कारभारात नागरिकांचा सहभाग अजिबात घेतला जात नाही. सिटीपीडिया न्यूजला हे सर्व अपेक्षित आहे.

सिटीपीडिया न्यूज हे ‘मतदाता जागरण अभियान’ या नागरिक चळवळीची ई-पत्रिका आहे. ‘मतदाता जागरण अभियान’ ही ठाणेस्थित नागरी चळवळ असली तरी ती ठाणे शहरापुरती मर्यादित नाही. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातील नागरीकरणाचा आवाका घ्यायचा आहे.

सिटीपीडिया न्यूज हे ‘सिटीपीडिया’ वेब पोर्टलचे प्रतिनिधित्व करते. ते सिटीपीडियाचे वृत्तपत्रीय अंग आहे. सिटीपीडिया हा शहरीकरण, समस्या, उपाय आणि संघटना यांचा मुक्त ज्ञानकोश आहे. ते शहरांच्या प्रश्नांचे खुले व्यासपीठ आहे. सिटीपीडियात प्रामुख्याने शहरे, शहरातील प्रश्न, शहरातील लोकांच्या समस्या, प्रशासन, लोक-चळवळ अशा शहराच्या संबंधित गोष्टींची चर्चा असेल. वाढत्या शहरीकरणामुळे प्रचंड प्रमाणात अस्वस्थता वाढत आहे, प्रश्नांची भीषणता वाढत आहे. या शहरात राहणाऱ्या सामान्य माणसाला सकाळ-संध्याकाळ अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरीकरणातून समस्या वाढत आहेत.

“आमच्या शहरावर आमचा अधिकार” असे म्हणत मुंबईला खेटून असणाऱ्या ठाणे शहर, या शहरातील वेगवेगळ्या विचार-धारेत काम करणारे सजग कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी ह्या अधिकारासाठी संवाद, संघर्ष आणि संघटन करीत लोक-चळवळीचा मार्ग पत्करला, त्यातून जन्म झाला “ठाणे मतदाता जागरण अभियान” या संघटनेचा. सिटीपीडिया ही या चळवळीतून, कामातून पुढे आलेली संकल्पना आहे. सिटीपेडिया या माध्यमातून आपण शहरातील प्रश्नांचा मागोवा घेणार आहोत, शहरातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण करणार आहोत, शहरातील लढाईला एक दिशा देणार आहोत. सिटीपेडिया मध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद तसेच अन्य शहरातील कार्यकर्ते आपले लिखाण करीत हा संदर्भ ग्रंथ परिपूर्ण करीत जातील आणि त्यातून सिटीपेडिया बनेल एक मोठा शहरीकरणाचा दस्तावेज.

व्हॉट्स ऍप, फेसबुक वगैरे सोशल नेटवर्किंग साधने असतांना सिटीपीडियाची गरजच काय? फेसबुकमघ्ये मित्रांचा समुदाय जमवता येतो आणि व्यक्त होता येते. पण ते वाटते तेवढे ‘खुलें नसते आणि त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य ‘प्रतिध्वनी’ सारखे उमटते. म्हंणजे त्यात एक प्रकारे आपणच आपल्याशी बोलत असतो. व्हॉट्स ऍपला खूप मर्यादा आहेत आणि ते गटांतर्गत परस्पर संवाद साधण्यापुरते मर्यादित साधन आहे. फेसबुक आणि व्हाट्स ऍपवर जुन्या पोस्ट पटकन शिळ्या होतात. दोन्हीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर खूप मर्यादा आहेत. उलट विकिपीडिया, सिटीपीडिया अशी डिजिटल माध्यमे आहेत की ज्यात समुदायाला एकत्रित अभिव्यक्ती मिळते. काहीच शिळे होत नाही आणि प्रत्येक लेख सतत चालूच राहतो. सिटीपीडिया हे नागरिकांसाठी एक असे खुले व्यासपीठ आहे की जेथे आपले प्रश्न, सुखदुःखे, अडीअडचणी मांडता येतील. यातील सर्व लिखाण सामुदायिकपणे व्हावे असे अपेक्षित आहे. ‘लिहा, वाट पाहू नका!’ ‘लिहा, व्यक्त व्हा!’ ही त्यावर घोषवाक्ये आहेत आणि सर्वांना ते आवाहन आहे.

‘सिटीपीडिया न्यूज’ मघ्ये महाराष्ट्रातील शहरविषयक बातम्यांचे असे संकलन असेल जे वृत्तपत्रांच्या शहर पुरवण्यावरून उधृत केलेले असेल आणि जे आपल्याला त्या त्या प्रश्नांवर विचार करायला लावेल. त्यावर चर्चा करता येईल, व्यक्त होता येईल. सिटीपीडियात असणारे सर्वच विषय: म्हणजे जसे लोकसंस्कृती, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, पर्यावरण, स्वच्छता, निवारा, शहर नियोजन वगैरे वगैरे येथे वृत्त स्वरूपात मिळतील. शिवाय लेख असतील. अपेक्षित हे आहे की यात सर्वांनी व्यापक प्रमाणात भाग घ्यावा आणि आपल्या आपल्या शहरविषयक समस्यांसाठीचे हे व्यासपीठ बनवावे. हल्ली सिटीझन जर्नलिझम ही कल्पना प्रिंट मीडिया आणि चॅनेल दोन्हींवर लोकप्रिय झाली आहे. त्याची ही अधिक प्रभावी, पण खूप पुढची आवृत्ती आहे असे म्हणता येईल.

सिटीपीडिया न्यूजसाठी हे सगळेच विषय महत्त्वाचे आहेत. तरी देखील तीन क्षेत्रांवर आम्ही भर देण्याचे ठरवले आहे. ती म्हणजे पर्यावरण, निवारा आणि जनसंस्कृती. त्याचप्रमाणे आमचे सर्वांना आवाहन आहे 0की मूळ सिटीपीडियात (citypedia.net.in) जाऊन विस्तृत लेखन, संपादन करावे. ते सर्वांना खुले आहे. त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आमची टीम उपलब्ध आहे. सिटीपीडिया न्यूज ऑनलाईन असल्यामुळे त्याचे सर्वत्र विस्तृत वितरित होईल. तसेच त्याच्या आवश्यक तेवढ्या प्रति छापून वितरित होतील.

संजीव साने – संपादक (सिटीपिडीया न्यूज)

Print Friendly, PDF & Email