प्लास्टिक बंदी कागदावरच : कोल्हापूर

राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू करून दीड महिना उलटला असला तरी नागरिकांकडून प्लास्टिकचा खुलेआम वापर सुरू आहे. काही ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांची सर्रास विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी प्लास्टिकला पर्याय म्हणून कागदी वस्तूंचा वापर झाला असली तरी महानगरपालिका, जिल्हा परिषद, प्रादेशिक प्रदूषण विभाग, अन्न व औषध प्रशासन या संबंधीत विभागांच्या दुर्लक्षामुळे प्लास्टिक बंदी धाब्यावर बसवली जात आहे.

राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्लास्टिक बंदीची घोषणा केली. मात्र व्यापारी व विक्रेत्यांनी कोर्टात धाव घेतल्यानंतर बंदी असलेल्या प्लास्टिकच्या साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उत्पादक व विक्रेत्यांना सरकारने तीन महिने मुदत देण्यात आली. जून महिन्यात तीन महिन्यांची मुदत संपल्यावर प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू झाली. सुरुवातीला काही दिवस कडक अंमलबजावणी झाली. मात्र प्लास्टिकला पर्याय द्यावा अशी मागणी करत व्यापारी, उद्योजक, दुकानदारांनी प्लास्टिक बंदीला विरोध सुरू केला. सरकारने ५० मायक्रॉनवरील प्लास्टिक बॅग्जना काही अटींवर परवानगी दिली. पण परवानगीचा चुकीचा अर्थ लावत व्यापारी, विक्रेत्यांनी बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंची खुलेआम विक्री सुरू केली आहे.

शहरातील महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील किराणा दुकानदार कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक बॅग्जमधून धान्य, मसाले यांची विक्री करत आहेत. शहरातील कपिलतीर्थ मार्केट, ऋणमुक्तेश्वर, पाच बंगला, शिवाजी मार्केट या भाजी मंडयांमध्येही प्लास्टिक बॅग्जचा वापर केला जात आहे. फळ विक्रेत्यांनी वरवर प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी केली असली तरी ग्राहकाच्या मागणीप्रमाणे चोरट्या पद्धतीने कॅरीबॅग्ज पुरवल्या जात आहेत. फूल बाजारात प्लास्टिक पिशव्यांचा वापर कायम आहे. काही ठिकाणी हार व फुले कागदात गुंडाळून दिली जात असली तरी बुकेसाठी कमी मायक्रॉनच्या शोभिवंत प्लास्टिक पेपरचा वापर सढळ हाताने सुरू आहे. महानगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मटण व फीश मार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच आहे. सुरवातीच्या काळात मटण, चिकन, मासे विक्रेत्यांनी डब्याचा आग्रह केला. पण गेले महिनाभर प्लास्टिक पिशव्यांतून मटण, चिकन, मासे, अंड्यांची विक्री होत असून हजारो प्लास्टिक पिशव्या कचऱ्यात दिसत असल्याने प्लास्टिक बंदीला हारताळ फासल्याचे चित्र दिसत आहे.

बेकरी व खाद्यपदार्थांच्या दुकानातून प्लास्टिक बंदी काही प्रमाणात पाळली जात आहे. ब्रेड कागदातून बांधून दिला जात असला तरी खारी, बटर, टोस्ट हे बेकरी पदार्थ प्लास्टिक पिशव्यांमधून दिले जात आहेत. काही बेकरी मालक प्लास्टिक पिशव्यांमध्ये वस्तू आणि त्यावर कागदी पिशवी असा दिखावा करीत आहेत. वडापाव, भजी या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर रद्दी पेपर व कागदी बॅग्जचा वापर केला जातो. चहासाठी प्लास्टिक कपाऐवजी कागदी कपांचा वापर सुरू झाल्याने प्लास्टिक कचरा कमी होण्यास मदत झाली आहे. मिठाईच्या दुकानात काही पदार्थांना कागदी तर अन्य पदार्थांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ व जेवण नॉनवोवन पॉलिप्रॉपीलीन बॅग्ज दिल्या जात आहे. कार्यक्रम, जेवणावळीत मात्र कॅटरर्सकडून मात्र बंदी असलेल्या प्लास्टिक द्रोण, कप, वाट्या, चमच्यांचा वापर केला जात आहेत. जेवणावळी, रस्सा मंडळासाठी प्लास्टिक पत्रावळ्या, द्रोणांचा वापर खुलेआम सुरू आहे. शहरात अनेक ठिकाणी उघडपणे दुकानातून बंदी असलेल्या वस्तूंची विक्री होत असूनही महानगरपालिकेकडून डोळेझाक केली जात आहे.

प्लास्टिक बंदीवर कारवाईची यंत्रणा शहरात महानगरपालिकेकडे आहे. पण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कचरा उठाव अन्य कामांचा उरक जास्त असल्याने प्लास्टिक बंदीकडे आरोग्य निरीक्षकांनी दुर्लक्ष केले आहे. ग्रामीण भागात तर प्लास्टिकचा वापर सर्रास होत आहे. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सर्व विभागांकडून होण्याची गरज असताना फक्त महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडूनच अंमलबजावणी केली जात असल्याचेही दिसते.

Print Friendly, PDF & Email

Author: admin