पर्यावरणाच्या सानिध्यात ‘ग्रीन गटारी’

ठाणे : परिसर दणाणून सोडणारे ध्वनिक्षेपक, परिसरातील नागरिकांची झोप उडविणारी गाडी आणि तळीरामांचा चाललेला धिंगाणा यांच्याऐवजी यंदाही पर्यावरणाच्या सानिध्यातील ग्रीन गटारी साजरी होणार आहे. येऊर एन्व्हायर्मेंटल सोसायटी आणि वनविभाग यांच्यातर्फे यंदाही शनिवार, ११ ऑगस्ट अर्थात गटारीच्या निमित्ताने मद्यपिंच्या पार्ट्यांपासून पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी नेचर ट्रेलच्या माध्यमातून पर्यावरणाशी मैत्री करण्याचा पर्याय पर्यावरणप्रेमींना देण्यात आला आहे.

 

आषाढ अमावस्या अर्थात ‘गटारी’चा मुहूर्त साधून तळीरामांची पावले ठाण्यातील येऊर परिसराकडे वळत असल्याचे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दिसून येते. मोठमोठ्या आवाजात कारमध्ये गाणी लावून गटारीचे ‘सेलिब्रेशन’ येऊरमध्ये दरवर्षी केले जाते. मात्र या सर्वांमुळे परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासासह पर्यावरणाचेही नुकसान होते. मात्र गटारीच्या अनुषंगाने येऊरमध्ये धिंगाणा घालणाऱ्या अतिउत्साही पर्यटकांना चाप लावण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्याला पोलिसांनीही सहकार्य केले असून गटारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त केला आहे. यंदा शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून येऊर परिसारत पर्यावरण संवर्धनाविषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा परिसर निसर्गाने समृद्ध असल्याने पर्यावरणाची हानी करण्यापेक्षा त्य़ाच्याशी मैत्री करा असा संदेश या संस्थांकडून दिला जाणार असून त्यासाठी नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यासाठी नेचर ट्रेलचे आयोजन करण्यात आले आहे. या ट्रेलच्या निमित्ताने निसर्गाची सफर अनुभवत येऊर परिसरातील विविध वृक्ष, त्यांचे फायदे, नैसर्गिक साधन संपत्ती यांची माहिती दिली जाणार आहे. सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत ही सफर पर्यावरणप्रेमींना अनुभवता येणार असल्याचे रोहित जोशी यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. त्यासह यंदा विविध संस्थांनीही पुढाकार घेत एकत्रित प्रयत्नांतून हा उपक्रम पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email

Author: admin