औरंगाबाद शहरात तीन दिवसांआड पाणी

औरंगाबाद – शहरात गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू आहे. सोमवारी (ता. सहा) झालेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा तीन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी काढले. शहरातील पाणीपुरवठ्यावरून शिवसेना-भाजप युतीमध्ये कलगीतुरा सुरू आहे.

भाजप नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनानंतर तत्कालीन आयुक्तांनी संपूर्ण शहराला तीन दिवसांआड पाणी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शिवसेनेने विद्यमान आयुक्तांकडे दोन दिवसांआड पाण्याचा आग्रह धरला. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दोन दिवसांआड संपूर्ण शहराला पाणी द्या, असे आदेश काढले. मात्र ठराविक वॉर्डांनाच दोन दिवसांआड पाणी देणे सुरू झाले. उर्वरित वॉर्डांना चौथ्या, पाचव्या दिवशी पाणी मिळत आहे. शनिवारी रात्री भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, उपमहापौर विजय औताडे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी आयुक्त  डॉ. निपुण विनायक यांची भेट घेऊन समान पाणीवाटपाची मागणी केली होती. त्यानंतर सोमवारी सर्वसाधारण सभेत रात्री उशिरा भाजप नगरसेवकांनी समान पाणीवाटपाचा मुद्दा लावून धरला. त्यावर खुलासा करताना कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी ‘मागील महिनाभरापासून शहरातील २२ वॉर्डांना दोन दिवसांआड पाणी देण्यात येत आहे, उपलब्ध पाण्यात ११५ वॉर्डांत दोन दिवसांआड पाणी देणे अशक्‍य आहे. पाणीपुरवठा विभागाने सर्व प्रयत्न केले. त्यानंतरही दोन दिवसांआडचे नियोजन होत नाही’ असे स्पष्ट केले. त्यावर भाजप नगरसेवकांनी तीन दिवसांआड सर्वांना पाणी द्या, अशी मागणी केली व महापौरांनी तसे आदेशही काढले

Print Friendly, PDF & Email

Author: admin